Thursday, September 29, 2022

परीस स्पर्श - कथाकथनाचा कार्यक्रम

जि.प.प्राथमिक शाळा रजापूर

 *परीस स्पर्श- कथाकथन कार्यक्रम*
 दिनांक 27 सप्टेंबर 2022
 *कथाकार- श्री. गणेश मोढे*

 जिल्हा परिषद औरंगाबादच्या शिक्षणाधिकारी मा. जयश्री चव्हाण मॅडम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा.कधी कलीमुद्दीन शेख सर यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजापूर येथे आज परीस स्पर्श या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात आज कथाकार श्री. गणेश मोढे यांनी 'आळशी सिंह' ही कथा विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी व व्यक्तीने कधीही फुकटचे घेऊ नये, आपण आपले कर्म करीत राहिले पाहिजे असा मोलाचा संदेश सिंहाच्या जीवनावरून देण्याचा गणेश भाऊ मोढे यांनी सुंदर प्रयत्न केला. 'आवडीचा रे माझा सिंह प्राण्याचा रे राजा' हे कृतीयुक्त गीत विद्यार्थ्यांकडून त्यांनी म्हणवून घेतले. यावेळी उत्स्फूर्तपणे तेजश्री काळे मॅडम व उपासना सेलूकर मॅडम यांनी देखील छोट्या- छोट्या कथा सांगितल्या. गेल्या दोन महिन्यापासून दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात येत असून या पुढचा टप्पा म्हणून आज 'परीस स्पर्श' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत शाळा शाळा मधून कवी, लेखक ,कथाकार, नाटककार यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद व्हावा हा या कार्यक्रमाचा हेतू होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खाडे यांनी केले, आभार उपासना सेलूकर यांनी मांडले.यावेळी शिक्षक श्रीकांत गोरे सर, वैजयंती गंधे मॅडम यांची उपस्थिती होती. १५१ विद्यार्थ्यांना या कथाकथनाचा लाभ मिळाला.🙏🏻🙏🏻🌹🌹🌷🌷

Tuesday, September 27, 2022

पुष्प प्रदर्शन 2022

पुष्प प्रदर्शन 
काल सहावीच्या वर्गात मराठी विषयाचा सुगंधी सृष्टी ह्या पाठाचं अध्ययन- अध्यापन चालू होतं. विद्यार्थी आपल्या घरासमोर, शेतात, शेजारच्या घरासमोर असणाऱ्या फुलाचे नाव सांगत होते. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, "सर मी उद्या गुलाबाचे फुल आणीन." "मी जस्वानंदाचे फुल आणीन". - दुसरा उत्तरला. अन् त्यातूनच पुष्प प्रदर्शन भरविण्याची भन्नाट कल्पना सुचली. आज इयत्ता सहावीच्या  वैष्णवी गांगुर्डे ,अश्विनी लहाने, प्रीती छत्रे, कोमल गांगुर्डे, रौनक शहा ,रोशनी शहा,  यश काळे असद शेख, या आठ विद्यार्थ्यांनी विविध फुले प्रदर्शनात मांडले होते. पुष्प प्रदर्शन बघण्याची शाळेतील १५० हुन अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळाली. शाळेचे मुख्याध्यापक मा.उमाकांत धतींगे सरांनी उद्घाटन केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.🌹🌷💐🌼🌸🌺🪷🥀

Wednesday, July 13, 2022

पुस्तक परीक्षण- EDU निर्णयाची नव परिभाषा

महाराष्ट्राच्या शिक्षणाची वाटचाल दिग्दर्शित करणारे पुस्तक- EDU निर्णयाची नव परिभाषा
                           - संजय खाडे ,औरंगाबाद

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (एटीएम) आयोजित पंढरपूर येथील पाचव्या शिक्षण संमेलनात महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे साहेब, शिक्षण अभ्यासक प्राची साठे मॅडम ,दूरदर्शन प्रणालीद्वारे सहभागी झालेले लडाख येथील शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक, राजस्थानचे अँप गुरू इम्रान खान, दिल्लीच्या फुल्ब्राईट शिष्यवृत्ती प्राप्त शिक्षिका मनु गुलाटी,केरळचे शिक्षण तज्ञ विधू नायर, सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, स्वेरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य बी.पी .रेंगे , एटीएम चे राज्य संयोजक विक्रम आडसूळ, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक ज्योती बेलवले, नारायण मंगलाराम, संदीप पवार, खुर्शीद शेख , भरत काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत' EDU निर्णयाची नव परिभाषा' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. २२ जून २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्राचे शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले. मनामनावर आलेली मरगळ झटकून गावोगावी झटून काम होऊ लागले. शासन-प्रशासन आणि गाव एक होऊन काम करायला लागले. शासनानेही या प्रयत्नांना खतपाणी घालत पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करून माडिया, गोंड ,खानदेशी अशा स्थानिक भाषांचा पाठ्यपुस्तकात थेट समावेश करून मातृभाषा आणि स्थानिक भाषेतून शिक्षणाला सुरुवात केली .अभ्यासक्रम निर्मिती मंडळाच्या सदस्यांची निवड, त्यात आलेली पारदर्शकता, तंत्रस्नेही शिक्षक चळवळ ,मोबाईलचा शैक्षणिक साहित्य म्हणून केला गेलेला सकारात्मक वापर, शिक्षणाची वारी, केंद्र स्तरापासून राज्यस्तरापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षण परिषदा आणि कार्यप्रेरणा कार्यशाळा , बालरक्षक चळवळ, ज्ञानरचनावाद, भाषा पेटी ,गणित पेटी, विज्ञान पेटी, तेजस ,स्पोकन इंग्लिश कार्यक्रम आणि गावागावात सुरू झालेल्या लोकसहभागातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रच्या रूपाने एक लोकचळवळ उभी राहिली .ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, तांड्यावरील शाळांनी कात टाकली. हजारो शाळा डिजिटल झाल्या आणि भौतिक दृष्ट्या संपन्न होण्याबरोबर गुणात्मक विकासाच्या वाटेवर वाटचाल करू लागल्या. राज्य, जिल्हा, तालुक्यात आणि केंद्र- केंद्रात शिक्षणाची बेटे तयार होऊ लागली. प्रशासकीय यंत्रणा सुद्धा पहिल्यांदाच मार्गदर्शक ,प्रेरक , प्रोत्साहकाच्या भूमिकेत दिसायला लागली. या सगळ्या बाबींचा इष्ट परिणाम होत महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांची स्थिती कधी नव्हे इतक्या अल्पावधीत कमालीची सुधारली. मराठी माध्यम आणि जिल्हा परिषदेच्या शाळा कडे बघण्याचा सर्वसामान्य पालकांचा एकंदरीत जनतेचा दृष्टिकोन बदलून सकारात्मक झाला. पटनोंदणी वाढण्यावर गळती झपाट्याने कमी होऊ लागली. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढू लागला. या सगळ्यातून शैक्षणिक दृष्ट्या प्रगत महाराष्ट्राची स्वप्ने महाराष्ट्र पाहू लागला. त्यातून राष्ट्रीय संपादणूक, 'असर' च्या सर्व्हेतही सकारात्मक परिणाम गेल्या काही वर्षात पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची ही देदीप्यमान वाटचाल पाहून मनोमन कौतुक वाटणाऱ्या सोनम वांगचुक यांना विविध शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून कृतिशील शिक्षक महाराष्ट्र म्हणजेच एटीएम या गुणवत्तेसाठी शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षक समूहाची माहिती मिळाली.  त्यांनी मागच्या वर्षी संपर्क करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या नंतर झालेले बदल आणि त्यांचा परिणाम यांचे दस्तऐवजीकरण करण्याची आवश्यकता बोलून दाखवली. कुठल्याही शैक्षणिक चळवळीत या दस्तऐवजाला असणारे अनन्यसाधारण महत्त्व सोनम वांगचुक यांनी प्रतीत केले आणि सोबतच हे काम राज्याबरोबर देशाच्याही शिक्षण क्षेत्राला दिशा देईल असा विश्वास बोलून दाखवला .त्यातूनच 'EDU निर्णयाची नव परिभाषा' या पुस्तकाच्या निर्मितीसाठी दिशा मिळाली. सदर उपक्रम राबवतानाचे महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव जे विविध उपक्रमात सहभागी होते त्यांनी स्वतः या पुस्तकातील लेखातून केलेले आहे. सदरील पुस्तकात एकोणावीस विषयावर लेख आहेत. सन २०१४ ते २०१९ या दरम्यान महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी त्या अनुषंगाने घेतलेले वेगवेगळे निर्णय व त्यामुळे झालेली शैक्षणिक प्रगती अधोरेखित करणारी ही लेख संपदा आहे. या लेखकाचे लेखक हे त्या त्या घटकाचे लाभार्थी व संबंधित आहेत त्यामुळे त्यांना त्या विषयातील पूर्ण बारकाव्याने वास्तव दर्शवणारे लेखन करता आले आहे . प्रत्येक लेखाच्या अगोदर प्राची साठे मॅडम यांनी त्या निर्णयाच्या अनुषंगाने असणारी पार्श्वभूमी थोडक्यात व्यक्त केली आहे. कारण त्या तत्कालीन शिक्षण मंत्री मा.विनोद तावडे साहेबांच्या ओएसडी असल्याने या प्रत्येक निर्णयाच्या साक्षीदार असत.
  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या मुख्य घटकात अंतर्भूत असलेल्या प्राथमिक स्तरावरील मन्वंतर हा सारिका बद्दे यांचा लेख,  रचनावादी उपक्रमाची मांदियाळी- जगदीश इंदलकर ,जलद गतीने शिक्षण- रणजित देशमुख यांचे लेख अंतर्भूत आहेत. तंत्रस्नेही शिक्षकांची गगनभरारी या मुख्य घटकात अंतर्भूत असलेले दिशादर्शक चळवळ या लेखाचे लेखन ज्ञानदेव नवसरे आणि प्रदीप देवरे यांनी केले आहे. डिजिटल शाळा -सोमनाथ वाळके, मोबाईल एक शैक्षणिक साधन -बालाजी जाधव , ऑफलाइन अँपची एक अनोखी संकल्पना- प्रकाश चव्हाण,  माझा ब्लॉगिंगचा अनुभव- सुयोग दीक्षित यांचे लेख समाविष्ट आहेत. समृद्ध शैक्षणिक साहित्य या मुख्य घटकात ज्योती बेलवले मॅडम यांचा जादूची भाषा हा लेख आहे .उमेश नेवसे यांनी संकल्पना सक्षम करणारी गणित पेटी हा लेख लिहिला आहे. जया इगे यांनी इंग्रजी पेटी या लेखातून इंग्रजी पेटीचे सविस्तर महत्त्व वर्णन केले आहे. प्रवीण शिंदे यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र या घटकावर आपला लेख लिहिला आहे. संस्थात्मक गुणात्मक बदल या मुख्य घटका अंतर्गत सात वेगवेगळ्या प्रकारचे लेख समाविष्ट आहेत.यात शैक्षणिक संस्थात्मक समायोजन- संदीप वाकचौरे, पाठ्यपुस्तक मंडळ निवड प्रक्रिया- नारायण मंगलाराम ,पाठ्यपुस्तकातील रचनात्मक व गुणात्मक बदल- समाधान शिकेतोड , क्यू आर कोड: पाठ्यपुस्तकाचे आधुनिक रूप- रणजीतसिंह डिसले , शिष्यवृत्ती परीक्षेतून शोध कुशाग्र बुद्धिमत्तेचा- पूजा जाधव, माडिया मराठी द्विभाषिक पुस्तक- रवींद्र रमतकर,  कृतीपत्रिका- स्वाती ताडफळे यांचे लेख समाविष्ट आहेत. शिक्षणाची वारी या मुख्य घटकांतर्गत अण्णासाहेब घोडके यांचा आस शिक्षणाच्या वारीची- भेट शैक्षणिक वारकऱ्यांची आणि सरला कामे यांचा बोलक्या बाहुल्या: एक दर्जेदार साहित्य हे लेख समाविष्ट आहेत. लोकसहभागातून शाळा समृद्धी- रवींद्र जाधव ,शाळा भेटीचे यश- प्रतिभा भराडे,  तांड्यावरचा शिक्षक ते पहिला बालरक्षक - जगदीश कुडे, पारदर्शी शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया-  संजय खाडे,  दहावी फेरपरीक्षा सोनेरी निर्णय: विक्रम अडसूळ , दहावी पुनर्परीक्षा एक मैलाचा दगड- एक विद्यार्थी,  तेजस : महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणातील इंग्रजीची भरारी -प्रदीप देवरे व  श्रीकांत गमे,  आय वॉन्ट चॅलेंज-  अश्विनी सोनवणे केळकर,  शिक्षक ते संशोधक-  रेणू धोत्रे , पवित्र: शिक्षक भरती-  राम अडसूळ,  भिलार: पुस्तकाचे गाव- उमेश कोटलवार,  बुके ऐवजी बुक- बालाजी इंगळे यांचे अत्यंत दर्जेदार असे लेख आहेत. कुमारवयीन शिक्षण व्यवस्था: विद्यार्थी व दिशादर्शक योजना अविरत प्रशिक्षणाचा एक अभिनव प्रवास हा श्वेता ठाकूर यांचा लेख समाविष्ट आहे. कलमापन चाचणी: लाभार्थी विद्यार्थिनींचे मनोगत यामध्ये नेहा जाधव यांचा लेख व कलारसास्वाद मुग्धा लेले यांचा लेख समाविष्ट आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ: विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणारे शिक्षण हा राहुल प्रभू यांचा लेख समाविष्ट आहे.
सदरील पुस्तकाची संकल्पना ,संकलन आणि संपादन करण्याचे कार्य सोनम वाङ्चुक, विक्रम अडसूळ आणि ज्योती बेलवले यांनी केले आहे. एटीएम पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं हे १५८ पृष्ठ असलेलं सुंदर पुस्तक आहे. या सर्व लेखांची भाषा ही सोपी व सुटसुटीत आहे. नव विचारांचा ध्यास घेऊन शिक्षणाच्या चाकोरीबाहेरच्या वेगळ्या वाटा शोधू पाहणाऱ्या शिक्षकांना हे पुस्तक अर्पण करण्यात आलेले आहे . मुद्रित शोधन कार्य विजय पोयरेकर यांनी केलेले असून अक्षर इंटरप्राईजेस लोअर परळ मुंबई यांनी मुद्रक व अक्षरजुळणी चे म्हणून काम केले आहे. मुखपृष्ठ सजावट अनंत खासबारदार कोल्हापूर यांनी केले आहे. अत्यंत सर्वांग सुंदर असलेल्या या पुस्तकाचे स्वागत मूल्य रुपये शंभर आहे . सदरील पुस्तक हे महाराष्ट्र सोबतच देशातील इतर राज्यांनाही उपयुक्त होऊ शकते असे राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अनेक तज्ञांच्या सल्ल्यानंतर  एटीएम प्रकाशनने लवकरच याची हिंदी व इंग्रजी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येकाने व उपक्रमशील, प्रयोगशील काम करणार्‍या  प्रत्येक शिक्षकाने वाचावं असं हे सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक नक्कीच वाचकांना आवडेल अशी खात्री आहे. 
शब्दांकन - संजय खाडे ,औरंगाबाद

प्लिकर्स अँप

बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे झटपट जाणून घेऊया प्लिकर्स अँपच्या सहाय्याने

मुलांना नवं नवं हवं असतं. म्हणून आज त्यांना QR कोड द्वारे बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजापूरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. प्लिकर्स अँप द्वारे क्षणात उत्तरे मिळाली. जाणून घेऊ थोडंसं.
वर्गातील विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारून ते तपासून देणे शिक्षकांसाठी मोठे जिकरीचे काम असते.शिवाय वेळ जास्त लागतो. यावर एक अत्यंत सोपा उपाय म्हणजे Plikers अँप. प्रथम https://www.plickers.com वर जाऊन  वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी क्रमांक नुसार नोंद Classes मध्ये करावी.New set द्वारे प्रश्न लिहावेत ते Your Library मध्ये प्रश्न संग्रहित राहतील.  A,B,C, D चार पर्याय द्यावे. विद्यार्थ्यांना plikers वरून डाऊनलोड केलेल्या Q R कोड च्या प्रिंट काढून घ्याव्यात. विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजेरी क्रमांक नुसार द्यावे. विद्यार्थी प्रश्न ऐकताच QR कोडचा योग्य पर्याय वरील बाजूस धरतील. शिक्षकांनी प्रश्न विचारून मोबाईल मध्ये हे अँप डाउनलोड करून अँप द्वारे स्कॅन करावे. प्रतिसाद देणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे मोबाईल स्क्रीन वर दिसू लागतात.सर्वांचे स्कॅन होताच बरोबर उत्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे लगेच मिळतात. टक्केवारी कळते. कुणाची उत्तरे चुकली तेही कळते. आलेख नुसार माहिती बघता येते. विद्यार्थ्यांना या नव्या तांत्रिक पद्धतीने उत्तरे देण्याचा आनंद वाटतो. शिक्षकांचा वेळ व परिश्रम वाचतात.
https://www.plickers.com/library

Tuesday, January 15, 2019

भरत सर,

पतंग उत्सव हा खूप छान व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
भरत सर,

पतंग उत्सव हा खूप छान व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.