Tuesday, March 7, 2017

माय ( कविता)

माय
( कविता , रचना दि.२५मे २०१६)
उन्हात तान्हात
माय हिंडते रानात
निसर्गाच्या गुजगोष्टी
माय सांगते गाण्यात.......
नागरटीच्या रानामधी
काश्या वेचण्याची घाई
मोघड्याच्या मागे मागे
पायाची होई लाही...........
धस्कटाच्या खर्सटानं
रक्त सांडलं आईचं
कळवळला बाप तेव्हा
धुडकं बांधी धोतराचं..........
मातीसंगे खेळताना
माय काढीते रांगोळ
अंगाअंगातून घाम
क्षणाक्षणाला अंघोळ ...........
काळ्या आईच्या उरात
खोल पडल्याती भेगा
किती दिसांचा उशीर
पड लवकरी मेघा...........
स्वप्न उद्याचे पेरीत
माय राबते रानात
जीवनाची सुख दुःख
सांगे मातीच्या कानात .......
      -- संजय खाडे
      मो.9421430955
       औरंगाबाद .
sanjaykhade511@gmail.com

मांजरीचे किर्तन


मांजरीचे किर्तन
( बालकविता)

एकदा म्याऊनं घातलं
छोट्या मडक्यात तोंड
फस्त केलं दही मग
तिला आली भोंड

मिटक्या मारत खाल्ले
भरलं भारी पोट
डोके गेले फसून
गळ्यात गुंतला गोठ

मनीम्याऊ चतूर
ऊंदरांना म्हणे
करणार मी पुण्य
विसरा सारे जुने

मनीम्याऊच्या किर्तनात
ऊंदरांची गर्दी
मनीचा गोड प्रसाद
शेवटी राहिलेले दर्दी

हररोज ऊंदीर
कमी कमी झाले
आता तर किर्तन
होईनाच गेले .

कवी:- संजय खाडे .
मो.9421430955 .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजापूर
केंद्र एकतूणी , ता.पैठण ,
जि.औरंगाबाद .
पिन 431121.