माय
( कविता , रचना दि.२५मे २०१६)
उन्हात तान्हात
माय हिंडते रानात
निसर्गाच्या गुजगोष्टी
माय सांगते गाण्यात.......
नागरटीच्या रानामधी
काश्या वेचण्याची घाई
मोघड्याच्या मागे मागे
पायाची होई लाही...........
धस्कटाच्या खर्सटानं
रक्त सांडलं आईचं
कळवळला बाप तेव्हा
धुडकं बांधी धोतराचं..........
मातीसंगे खेळताना
माय काढीते रांगोळ
अंगाअंगातून घाम
क्षणाक्षणाला अंघोळ ...........
काळ्या आईच्या उरात
खोल पडल्याती भेगा
किती दिसांचा उशीर
पड लवकरी मेघा...........
स्वप्न उद्याचे पेरीत
माय राबते रानात
जीवनाची सुख दुःख
सांगे मातीच्या कानात .......
-- संजय खाडे
मो.9421430955
औरंगाबाद .
sanjaykhade511@gmail.com
Tuesday, March 7, 2017
माय ( कविता)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment