कविता :- बैल
ग्रीष्माचं भारी ऊन
होई अंगाची अंगार
अशा तळपत्या रानी
बैल ओढीतो नांगर .......
असा गुंततो नांगर
जिद्द पेटते ऊरात
जीवाच्या आकांतानं
पुन्हा ओढीतो जोरात .......
काळी मोठी ढेकळं
पसरली रानभर
माती माती होईस्तुर
त्यात औताचा जागर.........
पेरणीची तिफण चाले
वाफसाल्या शेतातूनी
जगासाठी जीव झिजे
माझा बैल लई गुणी..........
पिकांच्या रांगामध्ये
तृणासाठी कोळपणी
कणसात भरे दाणा
खुश दिसे माझा धनी.........
बैल गाडीला जुंपता
कसा चालतो तो-यात
त्याच्यामुळे मान मला
माझ्या सा-या सोय-यात.......
माझ्या कुळाचं वैभव
बैल पिढ्यांचा सारथी
रास,पोळ्याच्या सणाला
त्याची प्रथम आरती..........
- संजय खाडे
औरंगाबाद .
मो.9421430955 .
No comments:
Post a Comment